अर्धापूर : नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथे एका मंदिरासमोर एक मोटरसायकल व पदाचाऱ्यास अज्ञात वाहनाने उडवले यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
अर्धापूर तालुक्यातील वाहेदपुर वाडी येथील एक जण दि. २२ रोजी दुपारी पार्डी येथे आला असता त्यांना भेटण्यासाठी कापसी येथील दोघेजण मोटरसायकलवर आले. दोघे रस्त्याच्या बाजूला बोलत असतांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांना धक्का दिला यात जबर मार लागल्याने श्रीकांत बालाजी कांबळे वय १६ वर्ष राहणार वाहेदपूर वाडी ता.अर्धापूर, गणेश अंसाजी नरवड वय १९ वर्ष, नारायण दामू देवरे वय २५ वर्ष दोघे रा.कापसी ता.कंधार जिल्हा नांदेड हे दोघे गंभीर जखमी अवस्थेत रोडवर पडले होते. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ माहामार्ग पोलिसांनी धाव घेतली. रमाकांत शिंदे, रवींद्र साकरकर, श्रीराम पांडागळे, अविनाश चव्हाण, इर्शाद बेग, सोनबा मुंडकर, कमलाकर जमदाडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली व जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी गणेश अंसाजी नरवड यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले.
रुग्णवाहिकेत जागे अभावी जखमींची हेळसांड...
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून एका अपघातात जखमींची संख्याही अनेक वेळा जास्त असते. फक्त एकाच अपघातग्रस्त व्यक्तीला नेण्याची सुविधा असलेले रुग्णवाहिका असल्यामुळे इतर जखमींना नेतांना महामार्ग कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. याकडे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

COMMENTS