किनवटमध्ये जयंतीनिमित्त रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदानासह विविध समाजोपयोगी उपक्रम; 'लेखणी प्रेरणा दिन' उत्साहात साजर किनवट | प्रतिनिधी...
किनवटमध्ये जयंतीनिमित्त रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदानासह विविध समाजोपयोगी उपक्रम; 'लेखणी प्रेरणा दिन' उत्साहात साजर
किनवट | प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. १ ऑगस्ट) किनवट शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण, पुतळ्यास अभिवादन, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अन्नदान आणि प्रबोधनपर कार्यक्रमांच्या माध्यमातून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उद्घाटक म्हणून बोलताना आमदार केराम म्हणाले, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा क्रांतिकारी वारसा निर्माण केला. शोषित, वंचित आणि उपेक्षित समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटविण्याचे महान कार्य त्यांनी केले. महापुरुषांच्या विचारांची विभागणी करणे म्हणजे मानवतेची विभागणी करण्यासारखे आहे."
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे विद्रोही लेखक, कवी आणि लोककलावंत होते. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा त्यांनी आपल्या साहित्याद्वारे व्यापक प्रसार केला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने १ ऑगस्ट हा 'लेखणी प्रेरणा दिन' म्हणून घोषित केला आहे. तसेच किनवट नगरपरिषद संकुलात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने गाळा व भव्य वाचनालय उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुजाता विनोद एंड्रलवार होत्या. प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील वाटा अधोरेखित करत "जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव" या ओळींचा संदर्भ देत त्यांच्या साहित्याने मानवतेचा संदेश दिल्याचे सांगितले. नगराध्यक्ष सुजाता एंड्रलवार व माजी नगराध्यक्ष के. मूर्ती यांनीही अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी युवानेते करण एंड्रलवार, उपनगराध्यक्ष हसन लाला, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, साजिद खान, सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार, मातंग समाजाचे तालुकाध्यक्ष शिवना कलगुटवार, ज्येष्ठ नेते मारोती सुंकलवाड, विनोद भरणे, सुधाकर भोयर, स्वागत आयनेनीवार, दादाराव कयापाक, नगरसेवक सुरज सातुरवार, प्रशांत कोरडे, संतोष मरासकोल्हे, अजय चाडावार,नगरसेविका ललिता मुनेश्वर, अनुसया अंनेलवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती सुंकलवाड यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी तर आभार लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी मानले. आयोजन समितीचे अध्यक्ष प्रवीण दोनकलवार व सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन केले.

COMMENTS