नवीन शैक्षणिक धोरणाच्या टास्क फोर्स मध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक करा भाजपा शिक्षक आघाडीची मागणी


नांदेड दिनांक 29 जून प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यांमध्ये गठित करण्यात आलेल्या टास्क फोर्स मध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे मराठवाडा विभाग संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

 नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन शिफारसीनुसार टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय राज्य व जिल्हा स्तरावरून प्राधान्याने करावयाच्या काही बाबी निश्चित करण्यात आले आहेत यासाठी सार्थक ही नियोजन पुस्तिका तयार करण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध संस्थांची जबाबदारी व त्यानुसार करावयाची आवश्यक कार्यवाही याबाबत एकूण 297 कार्ये ( टास्क) निर्धारित करण्यात आली आहेत. राज्यस्तरावरून ही सर्व कार्य विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी व कार्यवाहीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी समिती गठीत करण्याबाबत शासन आदेश दि.24 जुन रोजी काढण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक (अकॅडमिक ) व प्रशासकीय बाबीसाठी संबंधित कार्याबाबत कारवाई करण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये आयुक्त शिक्षण ( पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण उपसंचालक पुणे, विशेषाधिकारी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती, सहाय्यक संचालक (प्रकल्प) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, अवर सचिव/ कक्ष अधिकारी मंत्रालय, प्राचार्य ( समन्वय ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या आठ सदस्यांची यामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. अवर सचिव प्रविण मुंडे यांच्या स्वाक्षरीने हा शासन आदेश काढण्यात आलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या टास्क फोर्स मध्ये केवळ शासकीय प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आलेली आहे शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी व शिक्षण तज्ञांची नेमणूक यामध्ये करण्यात यावी. विद्याभारती सारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये अभिनव प्रकल्प राबविणाऱ्या संस्थेचे शिक्षणतज्ञ , शिक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांच्या नेमणुका शासनाने कराव्यात ज्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी मदत होईल. भाजपा शिक्षक आघाडीचे मराठवाडा विभाग संयोजक प्रा. नितीन कुलकर्णी यांनी ही मागणी केली आहे. विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना, तसेच शिक्षक आमदार, विधानसभा सदस्य,विद्याभारती पश्र्चिम क्षेत्राचे शिक्षणतज्ञ, निवृत्त न्यायाधीश,अशा सर्व घटकांचा समावेश करुन नवीन टास्कफोर्स चा शासनादेश त्वरीत निर्गमित करावा अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.यासाठी मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे विभाग सहसंयोजक श्री एकनाथ राऊत, रामचंद्र भोसले, ज्योती तुपे, अनिल मोरे,बाळक्रष्ण थापडे,प्रकाश चव्हाण , राज्य कार्यकारिणी सदस्य सर्वश्री विजेंद्र चौधरी, दत्ता पडोळे, शिवाजीराव पवार, प्रभाकर मुळे, तसेच जिल्हा संयोजक श्री विनोद राठोड उस्मानाबाद, नागनाथ खिंडे लातूर, सुर्यवंशी सुर्यप्रकाश लातूर महानगर,बन्सी हावळे बीड, अरुण वडकर परभणी, लक्ष्मीकांत क्षीरसागर परभणी महानगर,प्रा.गजानन कुटे हिंगोली,हावगीराव गोपछडे नांदेड, राजीव आंबेकर नांदेड महानगर, संजय भातलवंडे जालना,प्रा.सुनिल इंदुरकर औरंगाबाद , योगेश जगताप औरंगाबाद महानगर, आर.डी.भालेराव सर आदिंनी सांगितले आहे.

टिप्पण्या