आता तोंडाला मास्क बांधा व सुरक्षित अंतर ठेवा असे सांगणारा दूर अंतरावर गेला !
-------------------------------------------------
केज/प्रतिनिधी :- "सर्व गावकऱ्यांना महत्वाची सूचना की लॉकडाउन मध्ये कुणीही कामा शिवाय घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्क बांधावे आणि एकमेकां पासून सुरक्षित अंतरावर रहावे. अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. याची गावकऱ्यांनी नोंद घ्यावी." असे हातात मेगाफोन घेऊन मुख्य रस्त्याने आणि गल्लोगल्ली अँनाऊन्समेंट करीत फिरणारा कोरोना योद्धा बबन माने सर्व गावकऱ्यांना सोडून पंचत्वात विलीन झाला.
साळेगाव ता केज येथील ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा कर्मचारी बबन माने तसा गावातील बहुउद्देशीय कर्मचारी. गावात लाईट गेली की पोलवर चढुन व डीपीतील फ्यूज टाकून विजपुरवठा पुन्हा सुरळीत करणारा बबन माने. पाण्याचा हापसा दुरुस्त करणारा बबन माने. पाईपलाईन फुटली किंवा नादुरुस्त झाली की दुरुस्त करणारा बबन माने. ग्रामसभा असली की गावकऱ्यांनी हजर राहण्याचेआवाहन करणारा बबन माने. गावातील गल्लोगल्ली फॉगिंग करत फिरणारही बबन मानेच. गावातीलआठवडी बाजारातील वाहने शिस्तीत व व्यवस्थित लावण्याचे आव्हान करणारा बबन माने. बबन माने याने कोरोनाची साथ सुरू झाल्या पासून दररोज गावकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करणारा साळेगाव मधील खरा कोरोना योद्धा बबन माने. मात्र एवढा हा लढवय्या बबन माने याला मागच्या आठड्यात दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आणि एक आठवडा बबन माने हे स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथील कोरोना वॉर्डात कोरोनाशी लढत होता. पण दुर्दैवाने अशा या कोरोना योद्द्यालाच मृत्यूने गाठले आणि दि. २४ सप्टेंबर रोजी बबन माने कोरोनाशी लढता लढता मृत्यूमुखी पडला. अगदी तुटपुंज्या वेतनावर बबन माने याने आजपर्यंत ग्रामपंचायतीत सेवा केली होती. आज त्याचे कुटुंब उधड्यावर पडले असून कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विमा योजनेचा त्या कुटुंबाला लाभ मिळण्याची मागणी होत आहे. बबन माने यांच्यात अकाली जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बबन माने याची ऊणीव गावकऱ्यांना जाणवत आहे.
----------------------------------
COMMENTS